# Father Herman Bakhar# _ # अहमदनगर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्राचे शिल्पकार फादर हर्मन बाखर

                            स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेले फादर हर्मन बाखर हे अहमदनगर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्राचे शिल्पकार कसे ठरले याचा मागोवा सदर लेखातून आपण घेणार आहोत . 


✓ कोण होते फादर हर्मन बाखर ? 

                            साधारण परदेशी ख्रिश्चन धर्मगुरू म्हणले कि ते फक्त धर्म प्रसारासाठी भारतात आले असणार असा निष्कर्ष आपण गाठत असतो. परंतु फादर हर्मन बाखर याला अपवाद ठरतात. १९४८ साली स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेले फादर हर्मन बाखर हे महाराष्ट्रातील पुण्यात धार्मिक संस्थेत काम करण्यासाठी आले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यांनतर अहमदनगर जिल्यातील संगमनेर येथील ज्ञानमाता विद्यालयात त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर त्यांची अनुक्रमे केंदळ आणि हरेगाव याठिकाणी नेमणूक झाली असताना संस्थेची तेथील ४० एकर पडिक जमीन त्यांनी विकसित केली आणि सदर ठिकाणी उत्तम शेती निर्माण केली. सदर शेतीत प्रत्यक्ष काम करत असताना, शेतकऱ्यांचे प्रश्न फादर हर्मन बाखर यांना जवळून अनुभवायला मिळाले. आणि नेमकं हीच घटना किव्हा अनुभव त्यांच्या जीवनाला नवीन कलाटणी देणारा ठरला. लागलीच फादर हर्मन बाखर यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागात काम करण्याचा निर्णय घेतला. उपाशीपोटी असणाऱ्या माणसाला अध्यात्माचे ज्ञान पाजळता येणार नाही याची त्यांना खात्री होती.  



                          सध्या साधन असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात देखील पाणलोट क्षेत्रातील सुविधा आत्ता आहेत इतक्या प्रगत आणि विकसित नव्हत्या. अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष होते. आणि विहिरी किव्हा जलसिंचनाच्या इतर सुविधा निर्माण करण्याइतपत जनेतेची आर्थिक परिस्थिती सक्षम नव्हती. अशावेळी अहमदनगर जिल्ह्यातील शोषित आणि गरीब शेतकऱ्यांसाठी फादर हर्मन बाखर हे प्रत्यक्ष देवदूत च ठरले. सदर कामात त्यांचे सहकारी क्रिस्पिनो लोबो आणि डॉ . मनिषा मार्सेला यांनी देखील मोलाचे योगदान दिले आहे. 




                         ग्रामीण पट्यातील कोरडवाहू जमीन आणि सोबतीला अठराविश्व दारिद्र्य या विदारक चित्राने अस्वस्थ झालेल्या या अवलियाने या कष्टकऱ्यांच्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी १९६७ साली अहमदनगर जिल्ह्यातील  श्रीरामपूर मध्ये  सोशल सेंटरची स्थापना केली . पुढे या संस्थेचे कार्यालय अहमदनगर याठिकाणी हलविण्यात आले. 


                         सर्वप्रथम विहीर सिंचनासाठी फादर हर्मन बाखर यांनी पुढाकार घेतला. विहिरींची निर्मिती करण्यात अनेक अडचणी होत्या . पैशांचा प्रश्न, मजुरांचा प्रश्न, मशिनिरींचा प्रश्न असे एक ना अनेक प्रश्न समोर उभे ठाकलेले असताना  जिल्ह्यात एक एक करता करता हजारावर विहिरींचे काम फादर हर्मन बाखर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले. यासाठी फादर हर्मन बाखर यांनी अनेक आदर्शवत  योजनांची निर्मिती केली. 


✓  विहीर निर्मिती साठी कोणत्या योजना फादरांनी राबविल्या ?  


१ ]   " फूड फॉर वर्क "  योजना  } 

                          त्यातील तत्कालीन पहिली योजना होती " फूड फॉर वर्क " . कामाच्या बदल्यात अन्न या संकल्पनेला तत्कालीन काळात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला गेला.  अनेक लोकांनी सदर योजनेत काम करून आपले योगदान दिले आहे. 


२ ]   पत पुरवठा योजना } 

                          तत्कालीन काळात कृषी क्षेत्राला पतपुरवठा करण्यासाठी फारश्या संस्था अस्तित्वात नव्हत्या. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती भूविकास बँक हि एकमेव संस्था जमीन तारणाच्या बदल्यात पतपुरवठा करत होती. अशावेळी सदर बँके सोबत फादरांनी  समन्वय साधून सोशल सेंटर स्वता तारण राहील अशी तरतूद करून पतपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला. विहिरीवर वीजजोडणी आणि  वीजपंप  सुरु होईपर्यंत फादर स्वत लक्ष घालून मनोभावे काम करत असत. 


३ ]   व्याज अनुदान योजना } 

                          शेतकऱ्यांनी कर्ज हप्ता वेळेवर भरल्यास अशा शेतकऱ्यांना व्याज अनुदान देण्याची अभिनव योजना देखील सुरु करण्यात आली. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त मुद्दल भरावी लागत होती. 


४ ]   सिमेंट ब्लॉक कारखाना } 

                           अहमदनगर जिल्ह्यात काळी माती मोठ्या प्रमाणावर असल्याने जमीन खचण्याचे प्रमाण जास्त होते. अशावेळी फादरांनी सोशल सेंटर च्या माध्यमातून विहिरींवर पक्के बांधकाम करण्यासाठी सिमेंट ब्लॉक कारखाना सुरु केला.  



✓   विहिरींची जागा निवडण्याची पद्धत ? 

                           फादर हर्मन बाखर हे स्वता उच्चशिक्षित असल्याने वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे होते. त्यामुळे शास्रीय पद्धतीने पाणी साठ्याचा शोध घेवूनच विहिरीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येत असे. त्यावेळी भूजल सर्वेक्षणात दिल्ली येथील Action For Food Production हि संस्था भूजल सर्वेक्षणात काम करणारी एक विश्वासू संस्था होती. सदर संस्थेचे एक कार्यालय  फादर हर्मन बाखर यांच्या समन्वयातून सुरु करण्यात आले. 


जर्मन सरकारच्या योगदानातून त्यांनी महाराष्ट्रात इंडो-जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रकल्प राबविला आणि त्याअंतर्गत त्यांनी अहमदनगर , बीड, पुणे , नाशिक , नांदेड सह विदर्भातील अनेक जिल्ह्यात काम केले आहे . राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या गावात देखील फादर हर्मन बाखर यांनी अनेक शेतकऱ्यांना विहिरी निर्माण करून दिल्या असून आजही या सर्व विहिरी वापरात आहेत.  



https://rohitbaba10297.blogspot.com/2023/05/the-transformative-power-of-vipassana.html

* निष्कर्ष 

१९६५ - १९७० च्या दरम्यान सदर काम जोमात चालू होते. त्यांनतर पाणलोट क्षेत्रातील अनेक योजनांत फादर हर्मन बाखर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवन गावात फादर हर्मन बाखर यांनी क्रांतिकारी काम केल्याची आठवण आजही जेष्ठ सांगत असतात. २००९ पर्यंत याच गावात फादर हर्मन बाखर हे निवास करत होते. त्यांनतर ते आपल्या मायदेशी परतले. ऐकून साठ वर्ष भारतात राहून गोर गरीब लोकांची सेवा करणाऱ्या या अवलियाचे निधन २०२१ मध्ये झाले परंतु त्यांनी दिलेले आदर्शवत योगदान आजही हा महाराष्ट्र विसरू शकत नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एकेकाळचे महाराष्ट्रातील सर्वाधिक समृध्द गाव ! अहमदनगर जिल्ह्यातील याच गावात होता अशिया खंडातील पहिला खाजगी कारखाना!