एकेकाळचे महाराष्ट्रातील सर्वाधिक समृध्द गाव ! अहमदनगर जिल्ह्यातील याच गावात होता अशिया खंडातील पहिला खाजगी कारखाना!
एकेकाळचे महाराष्ट्रातील सर्वाधिक समृध्द गाव ! अहमदनगर जिल्ह्यातील याच गावात होता अशिया खंडातील पहिला खाजगी कारखाना!
* अशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखानाचा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख असली तरी अशिया खंडातील पहिला खाजगी कारखाना देखील याच अहमदनगर जिल्ह्यात होता हे मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सध्याच्या श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव या ठिकाणी अशिया खंडातील पहिला खाजगी साखर कारखाना सुरू करण्यात आला होता.या कारखान्याच नाव होते " बेलापूर शुगर इंडस्ट्रीज अलाईड लिमिटेड " सदर कारखान्याची मालकी मात्र थेट इंग्लंड मधील एका कंपनीकडे होती , आणि त्या कंपनीचं नाव होते 'ब्रँडी ' ! या ब्रँडी कंपनीने इंग्रज सरकार कडून हरेगाव आणि आजूबाजूच्या गावातील हजारो हेक्टर जमीन भाडेतत्त्वावर घेवून कारखाना सुरू केला . कारखान्यासाठी ऊस जागेवरच उपलब्ध व्हावा या हेतूने थेट अहमदनगर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भंडारदरा ( विल्सन डॅम ) या धरणातून पाणी याठिकाणी आणण्यात आले. याच पाटपाण्याच्या माध्यमातून हजारो एकर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे कच्चा व पक्का माल ने - आण करण्यात सुविधा म्हणून हरेगाव ते श्रीरामपूर या ठिकाणापर्यंत स्वतंत्र रेल्वे लाईन टाकण्यात आली आणि या रेल्वे लाईन चा शेवट थेट कारखान्याच्या गोडावून पर्यंत करण्यात आला. अशाप्रकारे अनेक सोयीसुविधा निर्माण करून 1917 साली अशिया खंडातील पहिला खाजगी साखर कारखाना उभारण्यात आला!
* म्हणून हरेगाव या गावाला एकेकाळी महाराष्ट्रातील सर्वाधिक समृध्द गाव म्हणून ओळखले जायचे..........
असे म्हणतात की, अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव या ठिकाणी अशिया खंडातील पहिला खाजगी कारखाना सुरू झाल्यावर परिसराच्या भरभराटीला सुरुवात झाली. कारखान्यामुळे अर्थचक्र जोरात फिरायला सुरुवात झाली. राज्यभरातून रोजगाराच्या शोधात लोकं हरेगाव या गावात यायला सुरुवात झाली. हरेगावात माणसांची रेलचेल वाढली तसे तेथील व्यवहार देखील वाढले. कारखान्याचे कामगार याच हरेगावात उसाच्या चिपटापासून झोपड्या बांधून राहत असत. स्थानिक जुन्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार ऐके दिवशी याठिकाणी मोठी आग लागली आणि सर्वच कामगारांच्या झोपड्या जळून खाक झाल्या.
तद्नंतर कामगार संघटना आणि कारखाना प्रशासन यांच्या समन्वयाने कामगार वर्गासाठी प्रशस्त आणि सर्व सोयसुविधाने युक्त अशा कामगार वसाहत निर्माण करण्यावर एकमत झाले आणि बघता बघता अशिया खंडातील पहिल्या खाजगी कारखान्याच्या कामगारांसाठी पहिली आधुनिक कामगार वसाहत निर्माण करण्यात आली. याच वसाहतीत सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सार्वजनिक व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पहिल्यांदाच सार्वजनिक टॉयलेट बाथरुम ची व्यवस्था करण्यात आली. कामगारांच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी कामगारांनी सोसायटी देखील स्थापन केली. त्यामध्यामातून दैनंदिन गरजेच्या वस्तू विक्री करण्यात येवू लागल्या.
त्याचप्रमाणे कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य राखण्यासाठी दवाखान्याची निर्मिती करण्यात आली. इतकेच नव्हे तर कामगारांच्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था व्हावी या हेतूने शाळा देखील सुरु करण्यात आली.
सोबतच सार्वजनिक वाचनालय देखील हरेगावात उभारण्यात आले. त्यावेळी हरेगावात वेगवेगळे टुरिंग टॉकीज यायचे आणि त्यांचे सिनेमा पाहता यावेत म्हणून हरेगावात आजूबाजूच्या गावातील लोक देखील गर्दी करायचे. हरेगावात अनेक करमणुकीचे कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असायची. दूरवरून लोकं या ठिकाणी येवून हाताला काम मिळेल या आशेने स्थायिक व्हायचे! असे म्हणतात की, त्याकाळी हरेगाव कुणालाही उपाशी ठेवत नसे.
सदर कारखान्याचे अवशेष आणि अनेक वस्तू तथा कारखान्याची जमीन देखील याठिकाणी आपणास भग्न अवस्थेत पाहायला मिळते. आणि प्रशस्त कामगार वसाहत आणि इंग्रजकालीन ठेवणीचे अनेक घरे बघितली की एका वेगळ्याच ठिकाणी आल्याची अनुभूती मिळते.
अशाप्रकारे एकेकाळी महाराष्ट्रातील सर्वाधिक समृध्द गाव म्हणून हरेगाव ने देशभरात नावलौकिक मिळविला होता. आणि याच हरेगावात अशिया खंडातील पहिला खाजगी साखर कारखाना सुरू करण्यात आला होता!




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा